Tuesday, December 8, 2020

चार दिवसांची (बाळंतीण) माहेरवाशीण....

 चार दिवसांची (बाळंतीण) माहेरवाशीण....


मुलीचे लग्न होते,आणि मग "सासुरवाशीण" , "माहेरवाशीण", पुढे जाऊन मग "बाळंतीण" ही सगळी विशेषणं आपोआपच मागे लावतात, आणि एक अल्लड, मनमोजी, स्वतंत्र अशी पोर अचानकच भावनाप्रधान, जबाबदार, हळवी, धाडसी बनते....लग्नाची नवीन वर्ष पानामधून दवबिंदू निसटावा, तशी भर्रकन निघून जातात, आणि ह्यामध्ये "ती" अजूनही स्वतःला शोधत राहते.... त्या दोघांच्या संसाराला पूर्णत्व मिळते, ते बाळाच्या आगमनाने... दोघेही खूप खुश होतात, एका नव्या चाहुलीची वाट पाहण्यात....
बाळंतपण म्हणजे बाईचा पुनर्जन्मच असतो, आणि ते अगदी खरे आहे....9 महिने पोटात जीव वाढवणे... त्याच्या बरोबर उठणे, झोपणे, त्याच्यासाठी खाणे, त्याच्यासाठी हसणे, आनंदी राहणे, औषधं घेणे, जॉब-व्यायाम-वेळेवर उठणे-आवरणे- अश्या बऱ्याच नेहमीच्या सवयींना स्वाहा करावे लागते....पण ह्यामध्ये आपल्या नवऱ्याची साथ सदैव असते, जी आधार देते आनंद देते...
खरं म्हंटलं तर, बायकांचा पुनर्जन्म हा 2 वेळेस होतो, एकदा लग्न झालं की आणि एकदा मुलं झालं की....दोन्ही वेळेस, तिची ती कधीच राहतं नाही....सर्वस्वी बदलते, दुसऱ्यांची होते...त्यांच्यात मिसळून जाते....
आणि ह्या सगळ्यात पदोपदी तिला माहेरची आठवण होत असते...अर्धे आयुष्य ज्या घरी तिने व्यतीत केले, ती आस, ओढ तिला लागते आणि 4 दिवसांसाठी ही माहेरवाशीण बाळासोबत माहेरी राहायला येते...आई बाबांना फोन जातो, आज मी येते बरका..." हो हो ये ये खुशाल, आम्ही वाट पाहतोय" असे म्हणत आई बाबांची तयारी चालू होते... घर झाडून पुसून स्वछ केले जाते, नवीन बेडशीट, पडदे घातले जातात...आवडीच्या गोष्टी फ्रीज मध्ये आणून ठेवल्या जातात....बाळासाठी खेळणी, नवीन कपडे आई अगदी आवडीने आणून ठेवते...गरम पाण्याची सोय, बाळासाठी खाण्याची जय्यत तयारी केली जाते...पेज, केशर बदाम पावडर, केळं घालून साजूक तुपातला शिरा (लापशी), शेवयांची खीर, तांदुळाचे घावन, टोमॅटो चा उपमा, सातूचे पदार्थ असे एकाहून एक पदार्थांची जय्यत तयारी केली जाते...घरी आले की भाकरी तुकडा ओवाळून, गरम पाण्याने पाय धुवून आमचे स्वागत केले जाते आणि घरात हास्याचा एकच सूर घुमतो...गळाभेटी, बाळाचे लाड आणि खूप गप्पा ह्यांमध्ये दिवस कसा निघून जातो कळतं नाही... तिच्या हातचे पदार्थ चापून खाल्ले जातात..त्यामध्ये घरचा अळू, विडा, ओवा, आले, टोमॅटो, बटाटा आणि अश्या अनेक गोष्टी असतात...बाळाचे लाड तर खूप केले जातात...आजोबा आजीसोबत खाणे, फिरणे, बागेत चक्कर मारणे, बालगीते ऐकणे, दंगा आणि मज्जा...
रात्री झोपायची वेळ येते तेव्हा आई पाठीवरून हात फिरवते आणि म्हणते, खूप दमली असशील ना, तू शांतपणे झोप...मी बाळाकडे पाहते... माझा सगळा शीण ह्यामुळे एका क्षणात निघून जातो आणि कित्तेक महिन्यांपासून दमलेली मी, उशीवर डोके ठेवून बिनधास्तपणे झोपून जाते....सकाळी उशिरा जाग येते आणि बाळाच्या आठवणीने मी ताडकन उठते आणि बघते तर बाळ आजीची गाणी ऐकत ब्रेकफास्ट करण्यात मग्न असते...तेव्हा डोळे पाणावतात...आणि मी दोघींना मिठी मारते...
संध्याकाळी बाबा म्हणतात, जा एक चक्कर मारून ये गाडीवरून...आणि मी खूप दिवसांनी गाडी हातात घेते आणि long drive ला जाऊन येते...प्रसन्न मनाने घरी येते...
दिवस सरत असतात, वेळ पुरत नसतो...नवऱ्याच्या आठवणीने आता सासरी जायची वेळ येते आणि मी पुन्हा सज्ज होते...पण ह्या सगळ्यात एक न एक क्षण आनंदाने उपभोगलेला असतो...समाधानाचा असतो...
ह्या क्षणाला मी नाव दिले आहे " माहेर" आणि ह्या क्षणाला जिवंतपणा देणारे ते आई बाबा...♥️

I have special place for her in my heart !!!

It’s a memory flash by google and showing memories 4 years ago….wooowhhh…a tiny face with pretty eyes are looking at me….smiling and crawlin...